04/09/2025
वार – गुरुवार
दि.०४/०९/२०२५
घोडेगाव येथे आदिवासींच्या विशेषपदभरतीसाठी 'उलगुलान मोर्चा’ चे आयोजन
एसएफआय व डीवायएफआय चे मा.प्रकल्प अधिकारी यांना निवेदन
घोडेगाव (दि.०४) : आदिवासी समुदायाच्या न्याय हक्कांसाठी व वसतिगृहांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) यांच्या वतीने मंगळवार, दि.९ सप्टेंबर, २०२५ रोजी घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर 'उलगुलान मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि समाज बांधव सहभागी होणार आहेत.
यावेळी मा. प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात १२,५२० पदांची विशेष पदभरती त्वरित सुरू करावी, आदिवासी आरक्षणातील रिक्त असलेली ५५,६८७ पदे तात्काळ भरावीत, आणि बोगस जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. यासोबतच मंचर येथील शासकीय वसतिगृहातील पाणीपुरवठा लाइनचे काम पूर्ण करण्यात यावे, घोडेगाव येथील मंजूर मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात यावे आणि शिनोली येथील वसतिगृहाच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी एसएफआय चे पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे, आंबेगाव तालुका अध्यक्ष निकिता मेचकर, सचिव रोहिदास फलके, उपाध्यक्ष समीक्षा केदारी आणि डीवायएफआय आंबेगाव तालुका सचिव अविनाश गवारी उपस्थित होते.