07/08/2020
प्रा.डॉ. सुभाष जाधव : नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणाचे खाजगीकरण करणारे; SFI आयोजित व्याख्यानात प्रतिपादन.
कोल्हापूर : स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा कमिटी ने "नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०" यावर विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी उपस्थितींंना संबोधित केले. झूम ॲप द्वारे झालेल्या व्याख्यानात ६२ जणांनी सहभाग घेतला.
प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले की, नवीन धोरण हे फक्त वाचतानाच आकर्षक वाटते परंतु प्रत्यक्षात अवलंबताना याचे अनेक दुष्परिणाम उद्भवू शकतात अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. या शैक्षणिक धोरणातील बदल सकारात्मक वाटत आहेत परंतु त्याची पूर्णता स्पष्टता दिली गेली नसल्यामुळे अनेक संभ्रम निर्माण होत आहेत. जसे की प्रलंबित सर्व शिक्षक भरती करू पण किती कालावधीत करून याची स्पष्टता नाही, शाळा एकत्रीकरण(क्लस्टर शाळा) करणे देखील योग्य वाटते पण सरकारी की खाजगी शाळा याची स्पष्टता नाही, कमी पटाच्या शाळा बंद करणार का? व त्यामुळे आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जास्त अंतरावरील क्लस्टर शाळेत जावे लागनार का ? २०३५ पर्यंत २६ टक्के वरून ५० टक्के पर्यंत पटसंख्या वाढवणार पण त्यासाठी शाळांची संख्या दुप्पट कराव्या लागतील याबद्दल स्पष्टता नाही, सरकारी शाळेत सर्व सुधारणा करण्याचे बोलले आहे पण त्यासाठी किती अनुदान देणार याची स्पष्टता नाही, महाविद्यालये एकत्रीकरण केल्यामुळे जवळपास तीस हजार महाविद्यालय बंद करावे लागतील याबद्दलही स्पष्टता नाही.
पुढे बोलताना डॉ. जाधव म्हणाले की, नवीन धोरण अमलात आणल्यानंतर दहा वर्षाच्या कालावधीत सर्व शिक्षण संस्थांना स्वायत्त व्हावे लागेल पण त्यासाठी वित्तीय निधी कसा गोळा करणार त्यामुळे विद्यार्थ्यांची फी वाढणार का याबद्दल स्पष्टता नाही. जर फी परवडत नसेल तर विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घ्यावे असं सुचवलं आहे, म्हणजेच बहुसंख्य गरीब विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातून बाहेर फेकले जातील. अनेक खाजगी व विदेशी विद्यापीठांना परवाने मिळणार आहेत, त्यामुळे शिक्षणाचे १०० % बाजारीकरण होणार यात शंका नाही. तसेच सगळ्यात महत्त्वाचं जातीय आरक्षणाबाबत कोणतीच स्पष्टता नाहीये. ८ ग्रेड पर्यंत स्थानिक बोलीभाषेतून शिक्षण देणे ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढेल, या शब्दात कौतुकही केले.
एकंदरीत हे नवीन शिक्षण धोरण भविष्यात गरीब व श्रीमंत विद्यार्थ्यांमधील दरी वाढवेल व त्यासाठी सर्व विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना यांनी वेळोवेळी विरोध करण्यास सज्ज राहिले पाहिजे, असे ही डॉ. जाधव म्हणाले.
सदर व्याख्यानासाठी एसएफआयचे जिल्हा अध्यक्ष सर्वेश सवाखंडे, जिल्हा सहसचिव प्रेरणा कवठेकर, मालोजीराव माने, प्रा. विनोदसिंह पाटील, अमोल नाईक, दत्ता चव्हाण, वैशाली दाभाडे, राजेंद्र पाडवी, मानसी गुरव, सुवर्णा पाटील, सविता पडदुणे, बाळासाहेब मोठे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावना जिल्हा सचिव रत्नदीप सरोदे तर आभार जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मोरे यांनी व्यक्त केले.