13/08/2024
तो राजहंस एक
(राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने ग्रंथपालांचे महत्त्व आणि सद्यस्थिती यावर प्रकाश टाकणारा लेख.)
कोणत्याही औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये मग ती शाळा असो, महाविद्यालय असो किंवा विद्यापीठ असो ज्ञानदानाचं कार्य सतत सुरू असते. या ज्ञानदानाच्या कार्यात जे दोन प्रमुख घटक मानले गेले आहेत ते म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी. परंतु या दोन घटकां व्यतिरिक्त तिसराही एक महत्त्वाचा घटक जो कायम दुर्लक्षित राहतो तो म्हणजे त्या शिक्षण संस्थेमधील ग्रंथपाल. विविध प्रकारच्या आणि विविध
स्वरूपातील वाचन साहित्यामध्ये जे ज्ञान संचित करून ठेवले आहे ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत सुलभ पद्धतीने आणि विनासायास पोहोचविण्याचं काम ग्रंथपाल करीत असतो. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि समाज व्यवस्थेमध्येसुद्धा ग्रंथपालाचे महत्त्व अजून तितकेसे ओळखले गेलेले नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा शैक्षणिक
ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांच्याबाबत पूर्णपणे उदासीनता दिसून येते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास आजही काही विद्यापीठांमध्ये गेले अनेक वर्ष ग्रंथपाल हे पद भरलेलेच नाही. शहरी आणि ग्रामीण भागातील काही प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये सुद्धा ग्रंथालयांचा कारभार हा ग्रंथपालाशिवाय गेले अनेक वर्ष सुरू आहे आणि त्याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही कोणत्याही सरकारने केलेली नाही किंवा सरकारने ती करावी असा ठोस पाठपुरावा सुद्धा शिक्षण व्यवस्थेतून आणि समाज व्यवस्थेतून झालेला दिसत नाही. ग्रंथपालाशिवाय ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकांची फक्त देवघेव कदाचित काही काळासाठी चालेलही, परंतु ग्रंथालयाचा जो मूलभूत उद्देश आहे तो मात्र ग्रंथपाल नसल्यामुळे पूर्ण होणार नाही. वाचकाला कमीत कमी वेळात हवे असलेले वाचन साहित्य मिळण्यासाठी म्हणून आवश्यक अशा ग्रंथवर्गीकरण, तालिकीकरण या शास्त्रीय प्रकिया, संदर्भ सेवा, माहिती सेवा, निर्देश आदी विविध वाचक सेवा पुरविणे ही पारंपरिक उद्दिष्टे मात्र साध्य होणार नाहीत. आजच्या या माहिती तंत्रज्ञान युगात तर ग्रंथपाल हा माहितीचा महासागर आणि उपयोजक यांच्यामधील महत्वाचा दुवा आहे. हे उद्देश पूर्ण होण्याकरता आवश्यक असणारी सर्व ग्रंथालयीन कौशल्ये ग्रंथपालाने शास्त्रीय दृष्टीने विकसित झालेल्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विद्याशाखेतून पदव्युत्तर पदवी घेत असताना आत्मसात केलेली असतात. शैक्षणिक अर्थाने तो कोणत्याही स्तरावरील शिक्षकाच्या शैक्षणिक अर्हतेशी बरोबरी करतो. इतर कोणत्याही वद्याशाखेप्रमाणेच
ग्रंथालय आणि माहिती शास्त्रामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये मूलभूत आणि पयोजित संशोधन देखील जागतिक स्तरावर सतत सुरू असते. विविध परिषदा आणि कार्यशाळांमधून ग्रंथालय आणि माहिती शास्त्रातील अद्ययावत ज्ञान हे ग्रंथपालापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे जो एक सार्वत्रिक गैरसमज आहे ते
ग्रंथपाल म्हणजे फक्त ग्रंथांची देवघेव करणारी व्यक्ती, असा नसून त्याच्याकडे माहिती कौशल्य आहेत आणि त्या कौशल्याचा उपयोग करून आजच्या माहिती युगामध्ये ज्ञानाधिष्ठित समाज घडवण्याच्या कामी ग्रंथपाल आपले कौशल्यपूर्ण योगदान देत असतो. परंतु जर आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यापीठ असो महाविद्यालया असो किंवा शाळा असो त्यामध्ये वर्षानुवर्षे ग्रंथपाल हे पद भरलेच जात नसेल तर समाजाने आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेने अजून ग्रंथपालाचे महत्व ओळखलेले नाही असेच दिसते. उच्च शिक्षण क्षेत्रांत ग्रंथपालाला शिक्षक म्हणून मान्यता दिलेली आहे. इतर कोणत्याही महाविद्यालयीन शिक्षकाप्रमाणेच महाविद्यालयातील आणि विद्यापीठ स्तरावरील ग्रंथपालालासुद्धा त्याच पद्धतीचे वेतन आणि सेवा शर्ती आहेत. परंतु शालेय ग्रंथपालांची अवस्था मात्र बिकट आहे. शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये ग्रंथपाल हे शिक्षकेतर पद म्हणून मान्य आहे आणि
तेसुद्धा विद्यार्थी संख्येनुसार अर्धवेळ किंवा पूर्णवेळ. इथे सुद्धा विरोधाभासच आहे. शालेय स्तरावरील ग्रंथपाल आणि महाविद्यालय किंवा विद्यापीठ स्तरावरील ग्रंथपाल यांची शैक्षणिक अर्हता आणि आत्मसात केलेली कौशल्य, करीत असलेले ग्रंथालयीन कार्ये आणि वाचकांना देत असलेल्या सेवा सारख्याच आणि त्याच दर्जाच्या असून देखील शालेय स्तरावर ग्रंथपाल हा शिक्षकेतर कर्मचारी तर उच्च शिक्षणामध्ये तोच ग्रंथपाल हा शिक्षक कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कित्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तर ग्रंथपाल हे पद नावालाच भरलेले असते. त्यांच्या दृष्टीने ग्रंथपाल ही व्यक्ती त्या संस्थेमधील जे सांगेल ते काम करण्यास उपयोगी पडणारी व्यक्ती असेच असते. कित्येक ग्रंथपाल मग ते शालेय असो किंवा उच्च शिक्षणातील असो, ग्रंथालयेतर काम करण्यातच त्यांचा बहुतांश वेळ जातो त्यामुळे ग्रंथालयीन कामाकडे , कौशल्याधारित कामाकडे दुर्लक्ष होते आणि परत त्याचे खापर हे त्या ग्रंथपालावरच फोडले जाते. संस्थेतील ज्या व्यक्तींना ग्रंथालय, ग्रंथालय व्यवस्था , ग्रंथपालन आणि ग्रंथालय व माहिती शास्त्र याविषयी
कोणतेही ज्ञान नाही अशा व्यक्ती म्हणजे त्या शिक्षण संस्थांच्या प्रमुखांपासून ते त्या शिक्षण संस्थेतील क्लार्कपर्यंत सर्वच जण ग्रंथपालाला गृहीत धरतात आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे, सोयीप्रमाणे ग्रंथपालाने ग्रंथालयाचे काम करावे अशी अपेक्षा करतात.
केवळ पुस्तक देणे आणि परत घेणे इथपर्यंतच ग्रंथपालाचे कार्य सीमित नाही आजच्या माहिती युगामध्ये आवश्यक असणारी माहिती शोधून मग ती एखाद्या पुस्तकातील असेल किंवा माहितीच्या महासागरात म्हणजेच इंटरनेटवर असेल ती शोधून त्यावर आवश्यक ती प्रक्रिया करून वाचकाला हव्या असणाऱ्या स्वरूपात कमीत कमी वेळात उपलब्ध करून देणे हे ग्रंथपालाचे कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची कौशल्य ही प्रत्येक ग्रंथपालात असतात मग तो ग्रंथपाल शालेय असो महाविद्यालयीन असो किंवा विद्यापीठ असो. राजहंस जसा दूध आणि पाणी वेगळे करतो असं म्हणतात अगदी त्याचप्रमाणे माहितीच्या या महासागरातून ग्रंथपाल अचूक, योग्य, अधिकृत आणि
विश्वासार्ह माहिती ग्रंथालयीन कौशल्याच्या बळावर वाचकांपर्यंत पोहोचवीत असतो. या अर्थानं ग्रंथपाल हा शिक्षण व्यवस्थेमधील एक राजहंसच आहे.
खरे तर प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये एकच ग्रंथपाल असतो आणि तो ग्रंथपाल त्या शिक्षण संस्थेमधील सर्व वाचक/उपयोजकांना ग्रंथालयीन आणि माहिती आधारित सेवा देत असतो. परंतु त्याचे महत्त्व लक्षात न आल्याने म्हणा किंवा इतर कोणत्या कारणाने म्हणा त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी, मुलांमध्ये वाचन आणि माहिती साक्षरतेची कौशल्ये कौशल्य रुजविण्यासाठी ग्रंथपाल ही एकमेव तज्ञ व्यक्ती असते. इतर कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती ग्रंथपालाची जागा भरून काढू शकत नाही. या अर्थाने कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये तो राजहंसाप्रमाणेच असतो परंतु त्याचे राजहंसत्व ओळखण्यास
आणि ते मान्य करण्यास मात्र अजूनही शिक्षण व्यवस्था आणि आपली सामाजिक व राजकीय व्यवस्था तयार नाही असेच दिसते.
डॉ चारुदत्त अच्युत गंधे
ग्रंथपाल
आदर्श बहुव्यापी शिक्षण व
संशोधन महाविद्यालय पुणे