08/10/2022
रयतची शतकोत्तरी वाटचाल..!
१) शिवछत्रपतींनी दीनदुबळ्या लोकांसाठी 'रयत' हा शब्द योजला, त्याच शब्दाचा पुनरुच्चार करीत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, तिला आज १०३ वर्षे पूर्ण होत आहेत.देशात कोणतेही शैक्षणिक धोरण नसताना स्वातंत्र्यापुर्वी रयतची स्थापना झाली होती,तदनंतर पन्नास वर्षानी महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली. त्यामुळे देश व राज्य सुसंस्कृत व साक्षर करण्यात रयतचे योगदान असून महाराष्ट्रातील जनता ते कधीच विसरू शकणार नाही..
२) लॉर्ड मेकॉलेच्या सिद्धांतानुसार, महाराष्ट्रात शिक्षण संस्था शहरात सुरू होत असतानाच कर्मवीरांनी 'काले' या ग्रामीण भागात शिक्षण आरंभ करून देशात ग्रामीण क्रांतीची ज्योत पेटवली.
३) ७३७ शाखा, पंधरा हजार सेवक व साडेचार लाख विद्यार्थी सध्या रयत मध्ये असून गेल्या शंभर वर्षांपासून हा 'ज्ञानयज्ञ' अव्याहतपणे सुरू आहे.
४) सध्या रयत प्रवाहात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक कोटीहून अधिक लोक असून न्युझीलंड, ऑस्ट्रिया, स्वीडन या देशांची लोकसंख्या देखील एक कोटीहून कमी आहे, म्हणून रयत ही आशिया खंडात प्रथम क्रमांकाची संस्था मानली जाते.
५) शताब्दी वर्षात रयतचे वार्षिक बजेट दहा अब्ज पन्नास कोटी रुपये एवढे असून, मागील काही वर्षांपूर्वी तर हे बजेट गोवा राज्याच्या बजेटच्या जवळपास होते!
६) महाराष्ट्रात रयतने पहिली कृषी शाळा धनिणीच्या बागेत सुरु केलीच, पण आजही १६७२ एकर रयतचे शेतीक्षेत्र आहे, विद्यार्थ्यांना शेती ज्ञान दिले जात आहे.
७) देशातील पहिले महिला डीएड कॉलेज राष्ट्रमाता जिजाउंच्या नावे सुरु करून महाराष्ट्रातील मुलींना शिक्षिका करण्याचे महान कार्य रयतनेच केले.
८) देशाच्या स्वातंत्र्यात तसेच गोवा मुक्तिसंग्रामात रयतने मोलाचे योगदान दिले आहे.
९) कर्मवीरांची इच्छा होती की 'रयत विद्यापीठ' व्हावे तिची पूर्तताही होत आहे याचा आम्हा सर्वांना अत्यानंद होतोय!!