05/03/2026
*डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावे अमरावती येथे शैक्षणिक संकुलाची होणार उभारणी*
*आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी*
*अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा करण्याची विनंती*
*अमरावती मधील शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी आ.सुलभाताई खोडके यांचा पुढाकार*
*मुंबई ( प्रतिनिधी )दिनांक -०४ मार्च अमरावती येथील शैक्षणीक वर्तुळात प्रशासकीय सुलभता तसेच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व जनतेच्या सोयीसाठी अमरावती शहरातील शिक्षण विभागाची सर्व कार्यालय एकाच छताखाली आणण्यासाठी अमरावतीच्या आमदार -सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी अमरावती येथील विभागीय शिक्षण उपसंचालक, कार्यालयाच्या परिसरात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने नविन सुसज्ज प्रशासकीय इमारत साकारून शैक्षणिक संकुलाची उभारणी करण्याबाबत आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. तसेच राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनादरम्यान येत्या ६ मार्च रोजी सादर होणाऱ्या बजेट मध्ये मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पिय भाषणात याबाबतची घोषणा करण्याची विनंती सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आहे.
अमरावती शहर हे विभागीय मुख्यालय असून विदर्भातील महत्वाचे शैक्षणीक केंद्र आहे. सद्यस्थितीत अमरावती शहरामध्ये शिक्षण विभागाची अनेक कार्यालये आहेत, ज्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक), लेखाधिकारी शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षण विभाग कर्मचारी निवास स्थान शिक्षणाधिकारी (योजना), अशी कार्यालये ही अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत आहेत. सदर कार्यालये विविध ठिकाणी कार्यरत असल्यामुळे त्यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्यामध्ये अडचणी येत आहेत. तसेच, कार्यालयांसाठी उपलब्ध असलेली सध्याची जागा अपुरी पडत असून, त्यामध्ये विविध सोयी सुविधांची देखील कमतरता आहे. सदर कार्यालयांच्या इमारती जुन्या असून त्यांची वेळोवेळी दुरूस्ती करावी लागत आहे.
त्यामुळे, सध्या अस्तित्वात असलेल्या विभागीय शिक्षण उपसंचालक, कार्यालयाच्या परिसरात नविन सुसज्ज प्रशासकीय इमारत/शैक्षणिक संकुल निर्माण करुन त्या इमारतीमध्ये शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी आमदार - सौ. सुलभाताई खोडके यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतला असून शासनाकडे पाठपुरावा देखील चालविला आहे. अमरावती मध्ये एकाच दालनाखाली शिक्षण विभागाची सर्व कार्यालये आणल्यास संपूर्ण अमरावती विभागातून येणारे विद्यार्थी, शिक्षक,अभ्यागत, अधिकारी, संस्थाचालक व कर्मचारी वर्ग यांना कार्यालयामध्ये येणे-जाणे अधिक सोईचे होवून श्रम व वेळेची बचत होईल.
तसेच शिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व कार्यालये एकाच इमारतीत कार्यान्वीत होवून परस्पर समन्वय साधणे सुलभ व अधिक सोईचे होऊन कार्यालया अंतर्गत माहितीचे आदान प्रदान विनाविलंब व जलद गतीने करता येईल. अशी बाब सुद्धा आमदार महोदयांनी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच शिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठका, अन्य शैक्षणिक उपक्रम इत्यादी करीता सुसज्ज बैठक व्यवस्था सदर प्रशासकीय इमारतीमध्ये उपलब्ध झाल्यास एकाच ठिकाणी बैठका व अन्य शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणे देखील सुलभ होणार असल्याने आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी पत्रातून अधोरेखित केले आहे. त्यामुळे प्रशासकीय सुलभता तसेच विद्यार्थी, कर्मचारी व जनतेच्या सोयीसाठी अमरावती शहरातील शिक्षण विभागाच्या सर्व कार्यालयांसाठी शैक्षणिक संकुलाची उभारणी करण्यात यावी, तसेच शिक्षण क्षेत्रात अमूल्य व अतुलनीय योगदान देणारे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा उचित गुणगौरव करण्याचे दृष्टीने सदर शैक्षणिक संकुलास डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल असे नाव देण्याबाबतची विनंती सुद्धा आमदार महोदयांनी केली आहे.
राज्यविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई स्थित विधानभवन येथे सुरू असून आगामी ६ मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२६-२०२७ चा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. यावेळी आपल्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल उभारणीबाबत घोषणा करावी अशी मागणी सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आहे.